गावच सांगतय आपली कहाणी

"गावच सांगतय आपली कहाणी....आठवणींनी येणारं गोड हसू, निसर्गाचं आदरातिथ्य, माणूस आणि निसर्ग यांच्यातील निवांत क्षण सांगणार आपापली कहानी.. ऐका, कहाणी तुम्हारी हमारी... एकाकी पडलेलं गाव सांगतय नातं निसर्गाचं आणि माणसाचं."

कविता

Jayashree Thitme

11/20/20241 min read

गाव नेहमी वाट बघतं. पायवाटांवर नजर लावून, एखाद्या आपल्या येण्याची आस धरून. शहरी गडबडीत हरवलेले आपण कधी त्या वाटेने पुन्हा येतो, ते गाव जिव्हाळ्याने पाहत राहतं. आणि एकदा आलं, की ते आपल्याला मिठीत घेतं—झाडांच्या सावलीतून येणाऱ्या गार वार्‍यासारखं, तळ्यातल्या शांत पाण्यासारखं.

लहानपणी मामाच्या गावाला गेलेली ती सुट्टी आठवते का? उन्हात पोहताना, झाडावर चढताना, किंवा रात्री अंगणात चांदणं बघताना जे काही अनुभवलेलं, ते सगळं आजही जिवंत आहे गावाच्या त्या मातीच्या गंधात. शाळा सुरू झाली की पुन्हा शहरात परत यायचं, पण गावाने दिलेल्या आठवणी कायम मनात जपायच्या.

आपण नेहमी म्हणतो माझं गाव, पण गाव कधीच म्हणत नाही, "मी ह्याचं गाव, मी त्याचं गाव."

गावाला येणारे गावासाठी सगळेच सारखे; मग तो टुरिस्ट असो, गावात एखाद्याकडे आलेला पाहुणा असो,

किंवा त्या गावातलाच एखादा गावकरी असो, त्याला सगळेच सारखे.

कसं असतं ना, गावात गेल्यावर प्रत्येकालाच वाटतं, लहान मूल व्हावं, आणि आईच्या कुशीत शिरावं.

हळूहळू बघता बघता तिथल्या प्रत्येक गोष्टी नकळत आपल्याला आपल्याच समजून हितगुज करायला लागतात.

त्या दिवशी पहाटे तळ्यावर मला बघून खंड्यालाही वाटलं,

"आज कुणीतरी शहरातलं पाखरू वेळ काढून खास मला बघायला बसलय वाटतं."

मग काय, त्यानेही आलेल्या पाहुण्याला खुश करण्यासाठी त्याची कला दाखवायला सुरुवात केली.

हे पाहून कमळालाही वाटलं, "नक्कीच कुणीतरी टुरिस्ट आलाय वाटतं.

चला, तयार व्हायची वेळ झाली! आज आपणही या टुरिस्टबरोबर दुसऱ्या गावात फिरायला जाणार वाटतं."

त्याचाही भाव वाढला.

मग काय, तळ्यावरच्या विहिरीलाही वाटलं. ती मला म्हणाली,

"अग, थांब! माझी आंघोळ तरी होऊ दे. मग व्हिडिओ काढ बाई!

एक तर मी जाणार फेसबुक, इन्स्टावर. माहित नाही, कुठे कुठे, कोण कोण बघणार मला.

थांब गं बाई, मला पण तर हवेत लाईक आणि व्ह्यूज."

हे सर्व बघून माझ्या लेखणीलाही वाटलं,

"आपण तरी कशाला मागे राहावं? आपण जे बंद वहीतून चोरून पाहिलंय,

ते हळूच वहीतल्या पानावर शब्दबद्ध करावं."

असं बघता बघता गाव कधी मागे पडलं, समजलंच नाही.

पण पुन्हा वाटलं, एवढं बोलकं गावही आपल्याला मात्र शांत करून गेलं.

आज गाव एकाकी झालंय. माणसं कमी झाली, पण निसर्ग मात्र अजूनही आहे—पक्ष्यांच्या किलबिलाटात, झाडांच्या सावलीत, आणि तळ्यातल्या प्रतिबिंबांत. गावाचं निसर्गाशी एक वेगळं नातं आहे; जणू ते दोघं एकमेकांशी हितगुज करत राहतात. आणि आपण शहरातून आलं, की ते नातं आपल्यालाही सामावून घेतं.

हीच आहे "गावच सांगतंय आपली कहाणी"—निसर्गाच्या आणि माणसाच्या नात्याची. तुम्हालाही जाणवेल की ती केवळ गावाची नाही, तर "कहाणी तुम्हारी हमारी" आहे. जिथे गाव बोलतं, निसर्ग बोलतो, आणि आपण फक्त ऐकत राहतो... मनाला शांत करणारा एक निवांत संवाद.

"मैंने जो लिखा है, वह आपको कैसा लगा? आपके विचार, सुझाव, या अनुभव जानने की उत्सुकता है। अगर कोई कन्फ्यूजन या सवाल हैं, तो कमेंट में ज़रूर बताएं—आपकी राय मेरे लिए महत्वपूर्ण है!"

मेरे सोशल मीडिया पर भी आप जाकर देख सकते हैं:

[YouTube link ]

[Instagram link]

[Twitter link]

Get in touch

Address

Mumbai, Maharashtra, India